महाराष्ट्रात सध्या अवाजवी आणि वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. लॉकडाऊन काळात ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे त्यांना वाढीव दराने बिल आल्याची घटना गेले काही महिने घडत आहे. या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत विचार केला जाईल व ग्राहकांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं होते. पण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे आता विरोधी पक्ष ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाला आहे.

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहेत. राज्य सरकारमार्फत सर्वसामान्य नागरिकांना जे वाढीव बिल आकारले आहे, त्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी भाजपातर्फे आंदोलनं केली जात आहेत. वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पॉवरस्टेशनमध्ये अचानक झालेल्या ग्रिड फेल्युअरमुळे मुंबई आणि उपनगरांमधील वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. इतका वेळ महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची टीका विरोधकांना केली होती. त्याच मुद्द्याच्या आधार घेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

आणखी वाचा- “आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”; मनसेच्या संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

 

राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

“ग्रिड फेल करता करता हे सरकार आता जनतेच्या न्यायलायातही अयशस्वी होताना दिसत आहे. या तिघाडी सरकारने जनतेला नेहमी त्रास देण्यावाचून दुसरं काहीही केलेलं नाही. जनता वाढीव वीजबिलामुळे त्रस्त आहे. जनतेसाठी आज भाजपा आणि लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या या तिघाडी सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो”, असं ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच #महाआघाडीवीजघोटाळा आणि #MVAPowerScam असे दोन हॅशटॅगही वापरले.

आणखी वाचा- “…उलट सावकारासारखी वसूली कसली करताय?”

याआधी, भाजपा नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली. “अवाजवी आणि वाढीव वीजबिलं आकारुन महाराष्ट्राच्या जनतेची लूट सरकार करु पाहतेय…सरकारच्या या “पठाणी” कारभाराची भाजपाने आज होळी पेटवली आहे! अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारासारखी वसूली कसली करताय? सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?”, असा संतप्त सवाल शेलार यांनी विचारला.