बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’मधील स्पर्धक तसंच आपल्या सूत्रसंचालनामुळे नेहमीच चर्चेत असतात. केबीसीच्या निमित्ताने चाहत्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळत असते. तसंच यानिमित्ताने ज्ञानात भर पडत असल्यानेही अनेक जण पाहणं पसंत करतात. दरम्यान कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर आक्षेप घेत सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार केली आहे. अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली असून हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसंच अत्यंत सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही”.

“हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.

“लातूर पोलिस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलिस गुन्हा नोंदवू शकतात. लवकरच एफआरआय नोंदवला जाईल अशी अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले आहेत.