महाराष्ट्रात सध्या वाढीव अवाजवी आणि वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. लॉकडाऊन काळात ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे त्यांना वाढीव दराने बिल आल्याची घटना गेले काही महिने घडत आहे. या मुद्द्यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत विचार केला जाईल व ग्राहकांना दिलासा दिला जाईल असं सांगितलं होते. पण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वीजबिलात ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नाही असं सांगितलं. त्यानंतर ही जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.

भाजपाने या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारमार्फत सर्वसामान्य नागरिकांना जे वाढीव बिल आकारले आहे, त्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी भाजपातर्फे आंदोलन केली जात आहेत. वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध केला जात आहे. तरीदेखील ठाकरे सरकार या नागरिकांना दिलासा देण्यास तयार नसून उलट ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

आणखी वाचा- “ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो…”; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“अवाजवी आणि वाढीव वीजबिलं आकारुन महाराष्ट्राच्या जनतेची लूट सरकार करु पाहतेय…सरकारच्या या “पठाणी” कारभाराची भाजपाने आज होळी पेटवली आहे! अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारासारखी वसूली कसली करताय? सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?”, असा संतप्त सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला असून या ट्विटमध्ये त्यांनी ‘महाआघाडीवीजघोटाळा’ हा हॅशटॅगही वापरला आहे.

आणखी वाचा- “आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”; मनसेच्या संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा- जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच व्यक्त केली नाराजी; भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका

दरम्यान, याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेकडर यांनी जाहीर आवाहन केले आहे की वाढीव वीजबिल भरणा करू नका. ज्याची वीज कापली जाईल त्याला वंचितचे कार्यकर्ते पुन्हा वीज कनेक्शन जोडून देतील. तसेच, राज्यात ५० टक्के वीज बिल सवलत दिली जाऊ शकते अशा टिप्पणीची फाइल महावितरणने राज्य सरकारकडे सादर केली होती. मात्र, एका वरिष्ठ मंत्र्याने ही फाइल दडवून ठेवली, असा आरोपही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.