बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपानं, ४३ जागा जदयूनं तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकांमधील विजयानंतर भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील कौतुक केलं आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

“काँग्रेसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन,” असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधत दिलं उत्तर; म्हणाले…

“भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या ‘जगंलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेनं नाकरलं. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- नितीश कुमार बोध घेतात की घात पचवतात, हे पहावं लागेल – रोहित पवार

आणखी वाचा- Bihar Election: “संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल”

एनडीए, महाआघाडीत चुरस

बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.