मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री ८ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत आणि अनलॉकबाबत बोलताना जनतेला अधिक सावध राहण्याचा संदेश दिला. या संबोधनात करोनासोबतच राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवरही मुख्यमंत्री भाष्य करतील अशी जनतेची अपेक्षा होती, मात्र या विषयांवर बोलणं मुख्यमंत्री ठाकरे यांनी टाळलं. त्यामुळे त्यांच्या रविवारच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या संबोधनावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. तशातच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात करोनाचा धोका वाढणं टाळायचं असेल तर राज्यातील जनतेने शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. असं न केल्यास राज्य धोक्याच्या वळणावर असेल, अशा आशयाचा संदेश उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संबोधनातून दिला. या वाक्याचा संदर्भ घेत अतुल भातखळकर यांनी ठाकरे यांच्या टीका केली. “ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो, ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते”, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच, रविवारी रात्री ८ वाजता झालेल्या संबोधनाच्या लाईव्हचं वर्णन त्यांनी ‘#वाफा@8pm” असं केलं.

आणखी वाचा- “आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”; मनसेच्या संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आणखी वाचा- जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच व्यक्त केली नाराजी; भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका

“मुख्यमंत्री प्रत्येक लाईव्हमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काळजी घ्यायला सांगतायत. मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे. ते घरी बसलेत, निर्णय घेत नाहीत, अर्थपूर्ण बदल्या आणि बढत्या सोडून प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे जनतेला काळजी घेणे भागच आहे. बाळबोध गप्पा मारताना एक महत्वाचा, लोकोपयोगी, ऐतिहासिक, हुकमी मुद्दा सांगायचे मुख्यमंत्री विसरलेले दिसतायत… तो मुद्दा म्हणजे ‘कोमट पाणी’… जन हो, करोनाचा धोका वाढलाय. मुख्यमंत्र्यांसारखे कायमस्वरूपी होम quarantine व्हा”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली.

आणखी वाचा- “…उलट सावकारासारखी वसूली कसली करताय?”

याशिवाय, मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनावर टीका केली. “मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडून आम्हाला काहीही अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे रविवारच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अजिबात अपेक्षाभंग झाला नाही, असा टोमणा मारत, ‘आपला मुख्यमंत्री, आपले दुर्दैव’, असं ट्विट देशपांडे यांनी केलं. तर “”नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण हे निराश करणारे होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ना ठोस कृती ना उपाय”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.