मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. त्यात ठाकरे यांची आक्रमक शैली दिसून आली. मुलाखतीत वापरलेली भाषा ही मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाला शोभणारी नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुलाखत चर्चेत आली आहे. भाजपाच्या एका नेत्याने त्यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विकासात रस नसलेल्या आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजपाला आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवलं हेच आमचं सर्वात मोठं यश आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. यावर भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी, “थोरातांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं”, असा त्यांना टोला लगावला.

आणखी वाचा- राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

भाजपाला सत्तेपासून दूर राखणं हेच यश आहे असं म्हणणं म्हणजे एखाद्या लग्न सोहळ्यात सुग्रास जेवणाच्या आशेने चोरून शिरलेल्या आगंतुकासारखे आहे, असे ते म्हणाले. ‘लग्नाला बोलवलं नसतानाही आतमध्ये शिरता आलं हेच यश, आता पोटभर जेवायला मिळेल मग खिशात आहेराचे पाकीट नसले तरी चालेल. अशा वृत्तीला भुरटेगिरी म्हणतात, अशा शब्दात भातखळकर यांनी थोरातांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.