भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला. पण चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. घाबरूनही जाऊ नये. मी केंद्राने दिलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही. आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचं असतं, त्या अर्थी मी गिरीश बापटांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही. अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. कारण हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रिया (Action and Reaction) चा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. मुख्य म्हणजे भविष्यात शरद पवारांना एखादं मोठं पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा अजित पवारांनी विचार करायला हवा”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते अजित पवार?
“सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन… हे जाईन सांगाताहेत पण त्यांना पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले. निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच ते परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरूडची कामं व्हावीत अशी अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले, तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना”, असा टोला अजित पवारांनी लगावला होता.