देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर केलं आहे. यातच आपण करोनाशी लढताना एकटे नाही. संपूर्ण देश एक आहे. आपल्याला अंध:कारातून प्रकाशाकडे जात करोनावर मात करायची आहे, असं म्हणत रविवारी ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून मेणबत्ती, टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं. यानंतर राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी प्रतिक्रिया देत यामुळे संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाईल असं म्हटलं होतं. यावरून आता भाजपाचे नेते राम कदम यांनी ऊर्जामंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो की बंद करून झोपतो?यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो,” असं कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. रात्री दिवे बंद करून संध्याकाळी सुरू करतो तेव्हा ग्रीड कोसळते का? असा सवालही त्यांनी केला.
मा @NitinRaut_INC यांनी सेंट्रल पॉवर ग्रिड च्या अधिकाऱ्यांशी अन्यथा .अन्य तज्ञांशी चर्चा न करता केवळ अअभ्यासपूर्ण व्हाट्सएपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे .देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो ? का बंद करून झोपतो?यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो https://t.co/ZdRzSqIiX7
— Ram Kadam (@ramkadam)
काय म्हणाले होते राऊत ?
“देशातील सर्वांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. आधीच (लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने) वीजनिर्मिती आणि मागणी याचं गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाइट बंद केले तर परिस्थिती अजून बिकट होईल. एवढ्या लोकांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. तसेच लाईट बंद न करता दिवे लावावेत अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.“सद्य परिस्थितीत महाराष्ट्राची मागणी २३ हजार मेगावॅट वरून १३ हजार मेगावॅटवर आलेली आहे. लॉकडाउनमुळे इंडस्ट्रियल लोड पूर्णतः शून्य आहे. १३ हजार मेगावॅट हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रसारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन सर्विसमध्ये यायला साधारण १६ तास लागतात याप्रमाणे सर्व परिस्तिथी नॉर्मल व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे. आपण करणाऱ्या या कृतीचा पुनर्विचार करावा आणि करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये वीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या वीजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं,” असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.