-वसंत मुंडे
खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याचे पडसाद आता दिसून येत आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जरी आपण नाराज नसल्याचे जाहीर केले असले, तरी देखील बीड जिल्ह्यातील काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांच्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सुनिता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह जवळपास २० पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कराड यांच्या शपथविधीनंतर नाराज असल्याचे वृत्त चुकीचे

बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात, राज्यसभा सदस्य भागवत कराड यांची वर्णी लागल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर दोन दिवस पंकजा मुंडे यांनीही मौन बाळगल्याने, काही जणांकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अखेर शुक्रवारी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगत, आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पंकजा मुंडे नाराज नसतील पण खासदार डॉ.प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आमची नाराजी कायम आहे, असे सांगत सर्वात अगोदर जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिला.

२० पेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी दिला पदाचे राजीनामा –

यानंतर आज (शनिवार) जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यम प्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २० पेक्षा जास्त पदाधिकार्‍यांनी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले.

नाराज नाही, पक्षाचा निर्णय मान्य-पंकजा मुंडे

अंबाजोगाईतील भाजपा नगरसेवकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाचे राजीनामे घेऊन मुंबईला गेले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक भाजपा पदाधिकार्‍यांनी राजीनाम्याचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमातून मुंडे-महाजन समर्थकांची लवकरच बैठक होणार असल्याचेही सांगितले जात आहे. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेनंतरही जिल्हाभरातील पदाधिकार्‍यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्यामुळे पक्ष नेतृत्व याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते, याकडे लक्ष लागले आहे. शनिवारी जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष पदाधिकार्‍यांचे जवळपास २० राजीनामे आले असुन, ते पक्ष नेतृत्वाकडे पाठवले जातील असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.

पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष-

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना, आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्‍यांसह समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकारी राजीनामा देत आहेत. कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका होत आहेत. पंकजा मुंडे नाराज नसल्या तरी आमची नाराजी कायम आहे, अशा भावना व्यक्त करत पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असुन राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांना पंकजा मुंडे काय आवाहन करतात आणि पक्ष नेतृत्व राजीनामा सत्राकडे कार्यकर्त्याच्या भावना की दबाव तंत्र म्हणुन पाहते? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.