राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी फडणवीस गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खडसेंनी भाजपा सोडताना फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान यासंबंधी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीसंबंधी बोलताना रक्षा खडसे यांनी सांगितलं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”.

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

“आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ? असं विचारण्यात आलं असता सांगितलं की, “अशा चर्चा खूप होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही”. पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील निवडणूकही भाजपाकडूनच लढणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता.