राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही बुडवू या शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून ह्या वादाची ठिणगी पडली. जाधवांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राला यांच्यापासून वाचवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात, राष्ट्रवादी-शिवसेना, तुम्ही दोघं हवं ते करा, एकमेकांना बुडवा किंवा बुडवू नका पण महाराष्ट्राला या दोघांपासून वाचवा अशी प्रार्थना सध्या जनता करत आहे.


“जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. काल कलेक्टर बदलायचा होता तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान पेटवलं जसे काही मोठा अपराध केला. आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं आहे, कुठपर्यंत सहन करायचं आहे”, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं होतं. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा-“राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू..;” शिवसेना खासदार संजय जाधवांचं खळबळजनक विधान

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर ३१ जुलैला आंचल गोयल या पदभार स्वीकारतील हे अपेक्षित होते. पदभार स्वीकारण्यासाठी त्या दोन दिवस आधी येथे आल्या. मात्र अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला. गोयल यांना परत जावे लागले. या सर्व प्रकाराची माध्यमांनी दखल घेतली. समाजमाध्यमावरही लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.