राज्यातील करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात लस तुटवडा निर्माण झाल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. एवढच नाही तर यावरून केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. महराष्ट्राला केंद्र सरकारकडून पुरेसा लस पुरवठा केला जात नसल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज दिवसभरातील लसीकरणासह शिल्लक लसींच्या संख्येची माहिती देऊन, राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.

”१२ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यत महाराष्ट्राला मिळालेला लसीकरणाचा साठा – १,२२,४०,३६०, राज्याने लसीकरण केले ती संख्या – १,०५,८१,७७०, राज्यात शिल्लक लसीचा साठा -१६,५८,५९०” अशी आकडेवारी केशव उपाध्ये यांनी आज ट्विटद्वारे दर्शवली आहे.

या अगोदर देखील केशव उपाध्ये यांनी लस तुटवड्याच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केलेली आहे. महाराष्ट्रातील लसीचा तुटवडा, लसी कमी असल्याचं संकट हे महाविकास आघाडीसरकार निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून नेमक्या लसी कोणाला दिल्या? नियम, अटीत बसणाऱ्यांनाच दिल्या का? याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे. असं ते म्हणालेले आहेत.

तसेच, लसीकरणावर हे तर राज्य सरकारच घाणेरड राजकारण सूरू महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळाल्या मग अचानक लसीकरण बंद कसं झाल? करोना हाताळणीतलं अपयश, मंत्र्यांचे कारनामे यातून लक्ष विचलीत करण्याकरता इतकं घाणेरडं राजकारण करू नका… आज लोकांना लस देण गरजेच आहे कृपया त्याकडे लक्ष द्या. असं केशव उपाध्ये या अगोदर म्हणालेले आहेत.