भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. खडसे हे भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… खडसे हे भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, “मी एकनाथ खडसेंशी बोलणार आहे. आमच्या आधी त्यांनी पक्षासाठी भरपूर काम केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान असे विचार मनात आणू नका अशी विनंती आहे”.

आणखी वाचा- एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश? चंद्रकांत पाटील म्हणतात…

जयंत पाटील यांनीही केलं भाष्य
शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का ? असं विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले.

“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.