केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि राज्य सरकारमधील संघर्ष अद्यापही सुरु असल्याचं चित्र आहे. पीयूष गोयल यांनी पुन्हा एकदा ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १४५ पैकी ८५ ट्रेन सुटणं अपेक्षित होतं. पण राज्य सरकारकडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात न आल्याने फक्त २७ ट्रेनच सुटू शकल्या असं ट्विट पीयूष गोयल यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकारला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की, गरीब मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी असंही ते म्हणाले आहेत.

पीयूष गोयल यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राने १४५ ट्रेन मागितल्यानंतर आम्ही रात्रभर आढावा घेतला. यानंतर योजना तयार करुन १४५ ट्रेन पोहोचवल्या. महाराष्ट्रात १४५ ट्रेन उभ्या आहेत, पण त्यांच्यासाठी प्रवासीच नाहीत. महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे”. महाराष्ट्र सरकारने जेवढ्या ट्रेन मागितल्या तेवढ्या आम्ही दिल्या. पण प्रवासीच नसल्याने विनाप्रवासी ट्रेन पुन्हा परतत आहेत असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने प्रवासी मजुरांच्या अडचणीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीयूष गोयल यांनी केला आहे. दुर्भाग्य आहे की अनेक ट्रेन मोकळ्या आहेत, अन्यथा लाखो लोक आज आपल्या घरी पोहोचले असते असंही पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून स्थलांतरित मजुरांसाठी १४५ ट्रेन सुटणार होत्या. रात्री ११ वाजेपर्यंत १४० ट्रेन सुटणं अपेक्षित असताना प्रवासी नसल्याने फक्त ६२ ट्रेनच सुटू शकल्या.

दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वे खात्यावर आरोप केला असून चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने 26 मे पर्यंत पश्चिम बंगालला कोणतीही ट्रेन न पाठवण्याचे पत्र रेल्वेकडे असतानाही रेल्वेने पश्चिम बंगालला जाणाऱ्या 35 ट्रेन महाराष्ट्राला दिल्या असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

Story img Loader