करोना टाळेबंदीत घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्यतेचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी, 23 जुलै रोजी चंद्रपूरमध्ये उघडकीस आली.

वरोड्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या माढेळी मार्गावरील वंधली येथे सुभाष धोटे हे दोन मुले व पत्नी सरलासह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी असतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यात सुभाषचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी सकाळी ही बाब लक्षात येताच पोलिस पाटलांनी वरोडा पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पती-पत्नीला वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी सरला हिला मृत घोषित केले, तर सुभाषची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता प्रथमदर्शनी तिचा गळा दाबून खून केल्याचे निदर्शनास आल्याचे डॉ. सिद्धार्थ गेडाम यांनी सांगितले. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास वरोडाचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Story img Loader