मराठा आरक्षणावरुन तीव्र पवित्रा घेतलेल्या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नाहीत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली.

महाजन म्हणाले, आषाढी एकादशी निमित्त सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या मराठा समाजात तीव्र भावना आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी पुजा करु न देण्याचा पवित्रा घेतल्याने त्यांच्या भावना लक्षात घेता, कुठलाही अनुचित प्रकार उद्या येथे घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर  पंढरपुरातील परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी  गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख यांनी रविवारी पंढरपूरला भेट दिली आणि मराठा समाजातील लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र, त्यांच्या भावना तीव्र असल्याने याचा काही लोक फायदा घेऊन जाणीवपूर्वक तणावाची परिस्थिती निर्माण करु शकतात. ही शक्यता लक्षात घेता हा सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे हजेरी लावू नये असे या दोघांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महाजन यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठा सोहळा असतो. यावेळी करण्यात येणाऱ्या महापुजेचा मान राज्याचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्र्यांकडे सपत्नीक असतो. त्यामुळे परंपरेने दरवर्षी मुख्यमंत्री येथे पुजेसाठी येत असतात. यंदाही ही पुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार होती. मात्र, मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापुजा करु देणार नाही, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. दरम्यान, सोलापूरात मोर्चेकरांनी हिंसक आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात उद्या होणारा आनंद सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अखेर मुख्यमंत्र्यांनी पुजेला न येण्याचा निर्णय घेतला.

तत्पूर्वी, देशमुख आणि महाजन यांच्या मोटारी आंदोलकांनी अडविल्या होत्या. दरम्यान, पंढरपूरचा रस्ता रोखून धरलेल्या आंदोलकांसमोर बोलताना सहकारमंत्री देशमुख यांनी पुढील वर्षीच्या आषाढी यात्रेपर्यंत मराठा आरक्षण मिळाले नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

Story img Loader