अपेक्षित भाव नसल्याने लागवड क्षेत्र निम्मे घटले

नीलेश पवार ,लोकसत्ता

नंदुरबार : पोषक हवामानात तयार झालेल्या मिरचीचे भाव क्विंटलला एक ते दीड हजार रुपयांनी घसरल्याने उत्पादकांचे आर्थिक समीकरण विस्कटले आहे. कापसाच्या तुलनेत मिरचीला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी या पिकापासून दूर जात आहे. दशकभरात मिरचीच्या लागवड क्षेत्रात निम्म्याने घट झाली. वाढत्या शहरीकरणात गावाबाहेर जाणाऱ्या मिरची पथाऱ्या आणि शासकीय अनास्थेमुळे मिरचीचे आगार ही नंदुरबारची ओळख धोक्यात आली आहे.

देशात गुंटुरनंतर मिरची उत्पादनात प्रमुख जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख. पण, मागील १० वर्षांत मिरचीचे उत्पादन क्षेत्रात घट होत आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्ह्य़ात सात ते आठ हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जात असे. मात्र आता हाच आकडा साडेतीन हजार हेक्टरवर आला आहे. मिरचीच्या उत्पादन क्षेत्रात निम्म्याने घट होऊनही शासकीय पातळीवर अनास्था दिसून येत आहे.

मिरचीचे संकरित वाण तयार झाले असून खास चवीचे वैशिष्टय़ असणाऱ्या शंकेष्वरी, जहरीला आणि फाफडासारखे पारंपरिक वाणदेखील नष्ट होत आहे. मिरचीच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव हे मिरची उत्पादनाच्या घटीस प्रमुख कारण आहे. कापसाचे व्यवस्थापन, तुलनेत एकरी जास्त उत्पादन आणि कमी पाण्यात उत्तम पीक यामुळे नंदुरबारमधील पारंपरिक मिरची उत्पादक शेतकरी हा कापूस या नगदी पिकाकडे वळला. त्यामुळे कापसावरील रससोषित अळ्यांमुळे मिरची पिकावर मोठय़ा प्रमाणात पडलेल्या घुबडय़ा रोगानेही मिरचीच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली.

यंदा मिरचीचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला. आतापर्यंत नंदुरबार बाजार समितीमध्ये जवळपास ५० हजार क्विंटल ओल्या मिरचीची आवक झाली आहे. प्रारंभी ओल्या मिरचीला चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला भाव दीड महिन्यात एक ते दीड हजार रुपयांनी घसरल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. रात्रीचे पाणी देऊन मिरचीच्या तोडीला किलोमागे तीन ते चार रुपये खर्चून आणि बाजारात भाडे खर्च करून मिळणाऱ्या दरातून काहीही साध्य होत नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मिरचीला हमी भाव देण्याची मागणी होत आहे. कधी काळी मिरची पिकाचे एकरी ३०० क्विंटल मिळणारे उत्पादन आता विविध कारणांनी १०० ते १२५ क्विंटलवर आले आहे. हा सर्व विचार करत शेतकरी अन्य पिकांचा मार्ग अनुसरत आहे.

देशात सर्वत्र बाजार समित्यांमध्ये सुकवलेल्या मिरचीची खरेदी जोरात असताना नंदुरबारमध्ये ओली मिरची खरेदी करून ती सुकवून तिच्यावर प्रक्रिया केली जाते. कधी काळी नंदुरबार शहराभोवती असणाऱ्या १५० हून अधिक मिरची पथाऱ्यांची संख्या कमी होऊन ७५ वर आली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मिरची पथाऱ्यांना जागादेखील मिळण्यात अडचणी येतात. त्यातच अवकाळी पावसाने मिरची पथारीवर होणारे नुकसान आणि व्यापाऱ्यांना न मिळणारी नुकसानभरपाई यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी या उद्योगातून काढता पाय घेतला आहे. शासन स्तरावरून नंदुरबारमध्ये मिरची पार्कची घोषणा झाली. परंतु, कागदी घोडे नाचवण्या पलीकडे ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे साधन असलेला मिरची उद्योग रसातळाला जात आहे. नंदुरबारच्या मिरचीला तिखटपणा, टिकण्याची क्षमता, वैशिष्टय़पूर्ण रंग आणि चव यामुळे परराज्यातून विशेष मागणी असते. पण, पुढील काळात  मिरची उद्योगाबाबत शासनाने योग्य पावले न उचलल्यास मिरची उत्पादक म्हणून नंदुरबारची ओळख पुसली जाण्याची भीती आहे.

मिरची पिकातील संकरित वाणाची चांगली उत्पादन क्षमता असते, मात्र पारंपरिक वाण असलेल्या  जहरीला, शंकेश्वरी, फाफडा यांचा उत्पादन कालावधीदेखील जास्त असल्याने पारंपरिक वाणातील शेतकरी हा संकरित वाणाकडे वळाला. त्यातच कापूस पिकाच्या तुलनेत मिरची पिकाला मिळणारा भावदेखील मिरची पिकाच्या क्षेत्र घटीस कारणीभूत ठरला. आगामी काळात पाणी, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनात नंदुरबार पुन्हा भरारी घईल या अनुषंगाने साऱ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे.

– पद्माकर कुंदे (पीक संरक्षण विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार.)

मिरची पिकाच्या एकरी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होत असतानाच दुसरीकडे ऐन हंगामात पडलेल्या दराने आर्थिक समीकरण विस्कटले आहे. यावर शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मिरची पिक, त्यावर खत आणि फवारणी खर्च, तोड, वाहतूक आणि उत्पादनाचा कालावधी यांची सांगड घातल्यास खऱ्या अर्थाने मिरचीचा तिखटपणा शेतकऱ्यांच्या नाकाला झोंबत आहे.

– राजेंद्र मराठे (मिरची उत्पादक).