राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनानिमित्त स्थापण्यात आलेल्या पोलीस कॅम्पला शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. दरम्यान, पोलिसांच्या कामाचे कौतुक करताना त्यांच्या अडीअडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी योगेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तर एपीआय वाल्मिक रोकडे यांनी पोलिसांच्यावतीने गृहमंत्र्यांशी संवाद साधला.
उपराजधानी नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांचे पोलीस येथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत. अधिवेशन काळात त्यांच्या राहण्यासाठी पोलीस कॅम्पची निर्मिती करण्यात आली आहे. येथे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुविधांव्यतिरिक्त पोलिस वाहने, कर्तव्यावर असताना जेवणाची सोय, एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्यांच्या वैद्यकीय सुविधेसाठी अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
१९७१नंतर येथे पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन सर्वार्थ्याने व्यवस्थित पार पाडावे यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे तयार आणि सज्ज आहे. यासाठी नागपूरच्या आरपीटीएस येथील पोलीस कँम्पमध्ये एकूण ११६० पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या सुविधांबाबत राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पोलिसांसाठी नव्या ५० हजार घरांच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी २०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी योजनांचीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.