काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात जे आंदोलन सुरु केलं आहे ते बेगडी आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावतीत त्यांनी रुग्णालयांना आणि क्वारंटाइन सेंटर्सना भेटी दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पेट्रोल-डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसच्या राजवटीतच झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. २०१८ मध्ये अशीच वेळ आली होती, तेव्हा आपल्या सरकारने ५ रूपयाने दर कमी केला होता.  आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात १ रूपया आणि आता २ रूपये व्हॅट वाढविला. एकूण 3 रूपये राज्य सरकारने वाढवले आहेत त्यामुळे त्यामुळे काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन हे बेगडी आहे”

आणखी वाचा- पेट्रोल – डिझेल दरवाढीने मध्यवर्गीयांचं कंबरडं मोडलं : सतेज पाटील

मुंबईत कमी चाचण्या

मुंबईत एका दिवशी सरासरी ५१०० करोना चाचण्या होत आहेत. तर दिल्लीत दररोज २१ हजार चाचण्या होत आहेत. कमी चाचण्यांची रणनीती चुकीची आहे. जोवर औषध येत नाही, तोवर कोरोना व्यवस्थापन हा एकमात्र उपाय आहे. आता आपण अनलॉक-2 कडे जात आहोत. पण, त्यात काय करणार हे स्पष्ट नाही. स्थानिक प्रशासनावर सारे काही सोपवून दिले, तर ते योग्य ठरणार नाही

आणखी वाचा- मोठी बातमी: संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन कायम, ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू

अमरावतीत सफाई कर्मचार्‍यांची कमतरता आहे, असे निदर्शनास आले आहे. अमरावती आणि अकोल्यात करोना रूग्ण आणि मृत्यूसंख्या वाढते आहे. संसर्गाचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. अशावेळी संख्येची चिंता न करता अधिकाधिक चाचण्या हाच उपाय आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.