दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणार हे सरकार आहे. मध्यमवर्गीयाचं कंबरडं मोडणारी, पेट्रोल डिझेल दरवाढ झाली असल्याने महागाई वाढणार आहे,  अशी टीका गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकावर सोमवारी केली.

काँग्रेस पक्षाच्यावतीने आज सर्वत्र इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. या अंतर्गत आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  पेट्रोल, दरवाढीचा निषेध करणारे फलक कार्यकर्त्यांनी याप्रसंगी हाती घेतले होते.

आणखी वाचा- पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, देशभर तीव्र निदर्शने

आंदोलनस्थळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, महापौर निलोफर आजरेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे , शशांक बावचकर आदी उपस्थित होते.

आणखी वाचा- पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, प्रमुख शहरांमध्ये काय आहेत दर ?

वेगवेगळ्या प्रकरणात केवळ दिशाभूल करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, असा आरोप करून शशांक बावचकर यांनी, यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप आता का बोलत नाही? असा सवाल उपस्थित केला.