नाना पटोले यांचे मित्रपक्षांना प्रत्युत्तर

मुंबई : स्वबळावर लढण्याच्या घोषणेने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीने नापसंती व्यक्त केली असतानाही, २०१४च्या धर्तीवर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, कोणताही धोका नको म्हणूनच स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले.

राज्यातील आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा पटोले यांनी केल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर टीकेची झोड उठवली. स्वबळाच्या घोषणेनंतर अजूनही वादाच्या ठिणग्या उडत असताना, आपल्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचे विधान करून त्यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले. आघाडीत त्यावरूनही खदखद सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रभारी एच. के . पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पाटील तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. त्या चर्चेत पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा आणि पोलीस पाळत ठेवत असल्याच्या आरोपाचा समावेश होतो असे सांगण्यात आले.

पवारांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते

प्रदेश काँग्रेस कार्यालयात माध्यमांशी बोलताना पटोले यांना शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीबाबत विचारले असता, ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस आंदोलन करणार आहे, त्या संदर्भात काँग्रेस नेते पवारांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. आपणास त्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, त्यामुळे आपण गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या आपल्या घोषणेबाबत बैठकीत चर्चा झाली, त्याकडे लक्ष वेधले असता, २०१४ मधील निवडणुकीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तर, स्वबळावर लढण्याची तयारी असावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावर व्यक्त केली. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती तुटली होती, त्याचा संदर्भ देत त्यांनी आपल्या घोषणेचे समर्थन केले.

शरद पवार सरकारचे रिमोट कंट्रोल

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, असेही पटोले म्हणाले. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार यांना भेटेन परंतु ती वेळ अद्याप आली नाही, असे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार. मी काही शिवसेना वा राष्ट्रवादीवर हल्ला करीत नाही, तर भाजपवर करतो, असे पटोले म्हणाले.