उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी काही उद्योजक तसंच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ यावेळी चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. यावरुनच आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्या आहेत. मुंबईमधील चित्रपट उद्योगाला आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा विचार असून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हा डाव असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

नक्की वाचा >> बॉलिवूडवरुन भाजपामध्येच ‘अ‍ॅक्शनपट’; योगींच्या मुंबई दौऱ्याआधीच चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपच्या पाच वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे चव्हाण यांनी भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केल्याचा आरोपही केला आहे. “मागील पाच वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक व औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना चव्हाण यांनी, “देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा टोला राज्यातील भाजपा नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, योगी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बॉलिवूडवरुन सध्या तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाची बाजू स्पष्ट केली आहे. पाटील यांनी कोणीही मुंबईमधून बॉलिवूड हलवू शकत नाही असं म्हटलं आहे.

काय आहे योगींचा प्लॅन?

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.