राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसून येत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०० नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ७ हजार ४३१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज २३१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,८३,३१९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६१ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,९६,७५६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३२,५६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली असून,
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७७,६०,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,९६,७५६ (१३.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७९,५५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७७,४९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, करोनाची साथ रोखण्यासाठी राज्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या टाळेबंदी वा इतर कठोर निर्बंधामुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे विकास कामांवरील खर्चावर निर्बंध आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या आर्थिक वर्षात सर्व विभागांना अर्थसंकल्पातील तरतुदींच्या फक्त ६० टक्के च निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.कोणत्याही कारणासाठी त्यापेक्षा वाढीव निधी कोणत्याही विभागास मिळणार नसल्याचे वित्त विभागाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.