राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सद्यस्थितीस राज्यात करोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेलेली असताना, आज औरंगाबाद शहरातही चार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता शहरातील करोनाबाधितांचा आकडा 24 वर पोहचला आहे.  अगोदरच औरंगाबाद शहर रेड झोन मध्ये असल्याने त्यात आणखी रुग्ण वाढल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

काल दिवसभरात शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत कुठलीही वाढ झालेली नव्हती. मात्र आज शहरात एकदम चार रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. आरेफ कॉलनी, किराडपुरा व देवळाई भागात हे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे चारही जण करोनाबाधित रुग्णांचे जवळचे नातेवाईक असून त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

देशात सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात करोना संकट कमी व्हायला तयार नाही. करोना रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. सोमवारी दुपारपर्यंत यात आणखी ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्याही पुढे गेली आहे.