करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा १,२५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडी अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रानं २५ हजार कोटींचं विशेष पॅकेज मंजुर करावं, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता केली आहे.

Live Blog

20:43 (IST)31 Mar 2020
महाराष्ट्रात वेतन कपात नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

आधीच करोनाचं संकट आहे आणि आज दुपारी अशी समजूत झाली की अनेकांचे पगार कापण्यात येतील. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही हे माझं आश्वासन आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.मात्र आज मी तुम्हाला ग्वाही देतो की कुणाचाही पगार कापला जाणार नाही. फक्त काही टप्प्यांमध्ये त्याची विभागणी होणार आहे. वेतन कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

20:37 (IST)31 Mar 2020
पालघर जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी

पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते.

19:57 (IST)31 Mar 2020
अमेरिकेत करोनाचं थैमान, एका दिवसात ५४० जणांचा मृत्यू

करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून शक्तिशाली अमेरिकेलाही त्याचा फटका बसला आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव न्यूयॉर्कमध्ये पहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात ५४० जणांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. परिस्थिती बिकट होत असल्याने न्यूयॉर्कच्या मदतीला नौदलाचं एक हजार बेड्सची सुविधा असणारं जहाज (USNS Comfort) पोहोचलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे ३१७० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

19:18 (IST)31 Mar 2020
पंतप्रधान मोदींच्या आईंनी पीएम केअर्स फंडाला दिली २५ हजाराची देणगी

करोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान केअर्स फंडाला नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बेन यांची २५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी आपल्या बचतीमधून ही रक्कम पंतप्रधान फंडाला दिली आहे. सरकारी सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

19:08 (IST)31 Mar 2020
चिंता वाढली : महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण

करोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

18:41 (IST)31 Mar 2020
…तरीच महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत – नितेश राणे

भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली असून चुकीच्या निर्णयाची मालिकाच सुरु केली आहे असं म्हटलं आहे. नितेश राणे यांनी संचारबंदीच्या काळात रस्त्यांची कामे सुरु करा असा आदेश निघाला आहे! मग या संबंधित सगळ्याच गोष्टी सुरु होणार. मग या कामगारांचं आयुष्य धोक्यात येत नाही का? असा सवाल विचारला आहे. तरीच महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

18:31 (IST)31 Mar 2020
मजुरांवर जंतूनाशकांची फवारणी, योगी आदित्यनाथ यांचे कारवाईचे आदेश

उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये काल मजुरांवर जंतूनाशकांची फवारणी करण्यात आल्याची घटना घडली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कृतीचा निषेध केला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्या अधिकाऱ्यांनी जंतू नाशकाची फवारणी करण्याचे आदेश दिले, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

17:08 (IST)31 Mar 2020
कल्याणी ग्रुपच्या भारत फोर्जकडून पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 कोटी

कल्याणी ग्रुपच्या भारत फोर्जसह अन्य कंपन्यांनी यांनी करोना विरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

17:06 (IST)31 Mar 2020
अमेरिकेतील बळींची संख्या ३००० पार

करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून मृतांचा आकडा तीन हजाराच्या पार गेला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रुग्णांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असून नौदलाचं १००० बेड्सचं जहाज (USNS Comfort) न्यूयॉर्कमध्ये दाखल झालं आहे. गव्हर्नर या जहाजाच्या स्वागतासाठी हजर होते. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

16:02 (IST)31 Mar 2020
मुंबईत पुन्हा मोठी कारवाई; ३० लाखांच्या मास्कचा साठा जप्त

मुंबईत पुन्हा एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्जिकल मास्कचा साठा जप्त केला आहे. यामध्ये एकूण ३०,५२, ५०० रुपये किंमतीचे मास्क हस्तगत करण्यात आले आहेत.

15:53 (IST)31 Mar 2020
हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन औषध घेणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

मेलरियावर प्रभावी ठरणारे हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध घेतल्याने एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आसामच्या गुवहाटी शहरात शनिवारी ही घटना घडली. सध्या करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधा वापर करण्यात येत आहे. वाचा सविस्तर बातमी.

15:25 (IST)31 Mar 2020
Coronavirus : लता मंगेशकर यांची ‘लाख’मोलाची मदत

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. तसंच देशातील काही जणांना करोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रसंगी अनेक सामाजिक संस्था आणि कलाकार मंडळींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काही रक्कम जमा केली आहे. पुढे वाचा...

14:44 (IST)31 Mar 2020
१५ एप्रिलपासून रेल्वे बुकिंगला सुरुवात

करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. राजस्थान पत्रिकाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

14:42 (IST)31 Mar 2020
या राज्यात चार तास सुरु राहणार मिठाईची दुकानं

पश्चिम बंगालमध्या मिठाईची दुकानं चार तास सुरु ठेवण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. लॉकडाउन असला तरीही पश्चिम बंगाल येथील दुकानं ४ तासांसाठी सुरु राहणार असल्याचं पश्चिम बंगाल सरकारने म्हटलं आहे. 

13:45 (IST)31 Mar 2020
करोना कनिकाची पाठ सोडेना; पाचव्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरची पाचव्यांदा करोना चाचणी करण्यात आली आणि पाचव्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. वाचा सविस्तर बातमी..

13:40 (IST)31 Mar 2020
Coronavirus : कनिकाविषयीची ‘ती’ माहिती खोटी; डॉक्टरांनीच केला खुलासा

‘बेबी डॉल’, ‘चिट्टीया कलाइया’ या सारख्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या कनिका कपूरला करोनाची लागण झाल्यामुळे सध्या तिच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कनिकाला करोनाची लागण झाल्यापासून तिच्याविषयीच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. यामध्येच काही अफवादेखील पसरल्या होत्या.मात्र या साऱ्यावर पीजीआय रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. के. धीमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे वाचा :

13:14 (IST)31 Mar 2020
Coronavirus : PM Cares या नावाने कशाला हवाय फंड?-रामचंद्र गुहा

करोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना PM Cares नावाने फंड काढण्याची गरजच काय? असा प्रश्न इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विट करुन हा प्रश्न विचारला आहे.आपल्या देशावर राष्ट्रीय संकट आहे. अशात पंतप्रधान स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही या PM Cares बद्दल पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारले आहेत.

13:03 (IST)31 Mar 2020
राज्यात करोनाचे ५ नवे रुग्ण; ४ मुंबईत, १ पुण्यात आढळला

राज्यात आज (मंगळवारी) करोनाचे नवे ५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४ मुंबईत तर १ पुण्यात आढळला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधितांची संख्या २३०वर पोहोचली आहे.

12:39 (IST)31 Mar 2020
करोनाशी लढण्यासाठी आमीर खानकडून २५० कोटींची मदत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर अनेक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर काही वेळातच २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची चर्चा सुरु आहे. आमीर खानने करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे २५० कोटींची मदत दिल्याचा दावा केला जात आहे. आमीर खानचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

12:12 (IST)31 Mar 2020
'एप्रिल फूल'साठी अफवा पसरवल्यास कारवाई - गृहमंत्री

आज ३१ मार्च आणि उद्या १ एप्रिल म्हणजेच 'एप्रिल फूल'चा दिवस या दिवशी सर्व लोक आपल्या मित्रमंडळींना विविध 'एप्रिल फूल'चे मेसेज पाठवून मजा मस्करीकरीत असतात. पण सध्या महाराष्ट्र आणि देशात करोनाचे संकट आहे. त्यामुळे चुकीचे मेसेज आणि अफवा पसरवल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

12:01 (IST)31 Mar 2020
'भारत करोनाविरुद्धचे युद्ध आरामात जिंकणार'; पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टराने सांगितली दोन महत्वाची कारणं

देशभरामध्ये करोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात असतानाच आंतरराष्ट्रीत स्तरावरील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर, डी. नागेश्वर रेड्डी यांनी भारतीयांना दिलासा देणारी एत बातमी दिली आहे. करोनाविरुद्धची लढाई भारत आरामात जिंकेल असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनचा कालावधी हा तीन ते चार आठवड्यांपेक्षा अधिक हवा होता, अशी इच्छाही रोड्डी यांनी व्यक्त केली आहे. रेड्डी हे सध्या एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रोइंन्ट्रोलॉजीचे अध्यक्ष असून २०१६ साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:57 (IST)31 Mar 2020
जयवंत वाडकरांच्या इमारतीत आढळला करोनाग्रस्त; संपूर्ण परिसर सील

करोनाग्रस्त व्यक्ती आढळल्याने मुंबईच्या गोरेगाव भागातील बिंबीसारनगर सील करण्यात आले आहे. या भागात अनेक मराठी कलाकार वास्तव्यास आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी हा भाग सील करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी..

11:24 (IST)31 Mar 2020
दिल्ली हादरली; एकाच इमारतीतील २४ जणांना करोनाचा संसर्ग

निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. निजामुद्दीन येथे झालेल्या या एका कार्यक्रामामुळे दिल्लीमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाच एमारतीतील २४ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. वाचा सविस्तर

11:03 (IST)31 Mar 2020
काबा, मदिना बंद होऊ शकतात तर भारतातील मशिदी का नाही : जावेद अख्तर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भारतातील मशिदीही बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांचा हवाला देत एक ट्विट केलं आहे.

सविस्तर वाचा - 

10:55 (IST)31 Mar 2020
बिहार: 'ते दोघे महाराष्ट्रामधून आले आहेत', अशी माहिती देणाऱ्या तरुणाची हत्या

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधून आलेल्या दोन जणांची माहिती करोना मदतकेंद्राला देणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला आहे.करोना मदतकेंद्रामधून फोन आल्याने या दोघे आरोग्य केंद्रात जाऊन करोना चाचणीचे सॅम्पल देऊन आले. त्यानंतर या दोघांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांना सोबत घेऊन बबलूला बेदम मारहाण केली. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:33 (IST)31 Mar 2020
सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; गाड्या जप्त करण्यास सुरुवात

राज्यात लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक बाबींकरताच घराबाहेर पडण्यास मुभा असताना नागरिक काहीतरी कारणं सांगून वाहनं घेऊन रस्त्यावर येत आहेत.

09:44 (IST)31 Mar 2020
चीनमध्ये मांसविक्रीच्या बाजारपेठा पुन्हा सुरु; कुत्रे, मांजरी, वटवाघूळाच्या मांस खरेदीसाठी हजारोंची गर्दी

चीनमधील वुहान शहरामधील मांसविक्री केल्या जाणाऱ्या बाजारपेठेमधून प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील १८३ देशामध्ये करोनाचा विषाणू पसरला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने ३१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र असत असतानाच चीनमध्ये मात्र परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. म्हणूनच तेथील सरकारने आता मांस विक्री करणाऱ्या बाजारपेठा पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

09:26 (IST)31 Mar 2020
महाराष्ट्रात आणखी पाच करोनाग्रस्त रुग्ण; आकडा २२५ वर

राज्यातील करोना बाधित रुग्णांचा वाढतच आहे. मंगळवारी आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आणखी नवीन पाच करोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईत १, पुण्यात २ तर बुलढाण्या २ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

09:09 (IST)31 Mar 2020
“मोदीजी, सर्व धार्मिक ट्रस्टने ८० टक्के संपत्ती करोनाविरुद्ध लढण्यासाठी द्यावी अशी सक्ती करा"

उत्तराखंडची राजधानी असणाऱ्या डेहराडूनमधील एका १५ वर्षाच्या मुलाने करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे. दहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने पंतप्रधानांकडे या पत्राद्वारे एक मागणी केली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

08:47 (IST)31 Mar 2020
नंदूरबारमध्ये भीषण परिस्थिती; डॉक्टरांना रेनकोटचं सुरक्षा कवच अन् पडद्यांचे मास्क

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स आपल्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांसाठी दिवस रात्र झटत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील नंदूरबारमधून एक धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. गुजरात सीमेला लागून असलेल्या नवापूर भागात काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडे करोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सेफ्टी सूट किंवा मास्कदेखील नाही. यापासून वाचण्यासाठी उपचार करताना डॉक्टरांना रेनकोट घालून रूग्णांचा उपचार करावा लागत आहे. तर काही रूग्णालयांमध्ये आणि क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांना पदडे आणि चादर फाडून त्याचे मास्क तयार करावे लागत आहेत.

सविस्तर वाचा

08:27 (IST)31 Mar 2020
महाराष्ट्रासमोर गंभीर आर्थिक संकट

देशात आणि राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यानं काही दिवसांतच चित्र पालटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत असून, राज्याच्या उत्पन्नाला यामुळे फटका बसला आहे. करोनामुळे राज्याचं उत्पन्न जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्राला पत्र पाठवले आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

Story img Loader