गेल्या चोवीस तासांमध्ये ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर पडली असून देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ५६,३४२ झाली असून १,८८६ मृत्यू झाले आहेत. १६,५३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांपैकी ४.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ३.२ टक्के रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. १.१ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. देशातील २१६ जिल्हे करोनामुक्त असून ५२ जिल्ह्य़ांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. २७ जिल्ह्य़ांमध्ये २१ दिवस तर, ३७ जिल्ह्य़ांमध्ये १४ दिवसांमध्ये, ६९ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत ३ हजार ४७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.
महाराष्ट्रात ११६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना रुग्णांची संख्या २० हजार २२८ इतकी झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १३ करोना बाधित रुग्ण आढळले असून यात ६ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. यातील दोन जण शहराच्या हद्दीबाहेरील असून त्यांच्यावरदेखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बधितांची एकूण संख्या १६७ वर पोहचली आहे. आतापर्यंत ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात एका करोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर या रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला करोनासह इतरही आजार होते. या रुग्णाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
आजपर्यत पुरंदर तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नव्हता परंतु आता खंडेरायाच्या जेजुरीत एका तरुणाला करोनाची लागण झाली आहे.पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी आज जेजुरी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुनम शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.
खंडोबा देवस्थानच्या डायलेसिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रुग्णाच्या संपर्कातील २४ जणांना जेजुरीत तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.तर २१ जणांना घरातच होम कॉरंटाइन करण्यात आले.
अकोला : शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून, करोनाबाधितांच्या एकूण संख्येने दीड शतकाचा उंबरठा गाठला आहे. एकाच परिवारातील पाच जणांसह १० नव्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज, शनिवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२१ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात करोना बधितांची संख्या २१४ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७ नव्या करोना रुगणांची वाढ झाली आहे. पनवेश शहरात ५ तर पनवेल ग्रामीण भागात २ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ६८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
पुणे शहरातील अनेक भागातील परप्रांतीय नागरिकांना घेऊन आज रात्री रेल्वे मध्य प्रदेश येथे रवाना होणार आहे. त्यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन येथे नागरिक पुणे स्थानकावर जाताना.
नवी मुंबईत एका दिवसात सर्वाधिक करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एकाच नवी मुंबईत ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील एकूण करोना बधितांची संख्या ५९२ वर पोहोचली असून.२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारताच आयुक्त इकबाल चहल हे धारावीत दाखल झाले. इथल्या परिस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. करोना बाधितांच्या नजिकच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे अशा सूचना चहल यांनी केली. धारावी सारख्या विभागात इमारती आणि झोपड्यांमध्ये आढळणाऱ्या रुग्ण संख्येचं वर्गीकरण करावं अशीही सूचना चहल यांनी दिली.
सोलापुरात आज (शनिवारी) २० करोनाबाधित रूग्ण आढळून आले. यात एका मृत महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या २१६ वर पोहोचली असून मृतांचा आकडादेखील १४ इतका झाला आहे. करोनाबरोबर 'साथी'चा फैलाव वाढल्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.
राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सोमवारपासून एस. टी. सेवा सुरु करण्यात आली आहे. हा प्रवास मोफत असणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. करोना आणि लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही एसटी सेवा असणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या लोकांना प्रवास करायचा असेल तर त्यांची चाचणी होणार असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे शहापूर तालुक्यावरील करोनाचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. शनिवारी तब्बल पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून यात एका महिलेचा समावेश आहे. यानंतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६ वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा आठ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता.
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे त्यामुळे पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी समनव्य साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे. (सविस्तर वृत्त)
महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, शहरी भागातून आपल्या गावी बसेसने जाणाऱ्यांकडून दुप्पट भाडे आकारण्याचा शासन आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी सरकारकडे केली.
करोना व्हायरसच्या उपचारानंतर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या डिस्चार्जशी निगडीत नव्या गाईडलाईन्स सरकारनं जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार मध्यम लक्षणं असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना चाचणीशिवाय डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांना सलग तीन दिवस ताप किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही ठेवण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांना १४ ऐवजी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.
करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत असताना पोलीसदेखील आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर सुरक्षा देत आहेत. मात्र नागरिक आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्य पोलिसांवर हल्ला होत असल्याच्या अजूनही समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून २७ वर्षीय तरुणाने पोलिसांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्किटेक्ट असणाऱ्या या आरोपीचं नाव करण नायर असून त्याला अटक करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्हला हा सगळा प्रकार घडला. (सविस्तर वृत्त)
करोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले आहे. दरम्यान देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे. (सविस्तर वृत्त)
करोना व्हायरसमुळे अमेरिकेत अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. तिथे ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तिथल्या वैद्यकीय व्यवस्थेवर मोठया प्रमाणावर ताण आहे. वैद्यकीय क्षेत्राची ही गरज पूर्ण करण्यासाठी परदेशातील हजारो डॉक्टर, नर्सेस यांना कायमस्वरुपी कायदेशीर नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड द्यावे असा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 17 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 500 च्या उबंरठ्यावर म्हणजेच 495 वर पोहचली आहे.
चीननमधील वुहान मार्केटमध्ये होणाऱ्या जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेने करोना व्हायरसचा फैलाव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचा दावा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने मात्र जगभरात अशा बाजारपेठ बंद करण्याची कोणतीही शिफारस किंवा सल्ला आपण दिला नसल्याचं सांगितलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ञ पीटर बेन यांनी सांगितलं आहे की, जिवंत प्राण्यांची बाजारपेठ जगभरातील अनेक लोकांच्या कमावण्याचं साधन असून प्रशासनाने त्या बंद करण्याऐवजी सुधारणा करण्याबाबत विचार केला पाहिजे. (सविस्तर वृत्त)
उपरजधानी नागपुरात करोनाचे आणखी सात नवीन रुग्ण आढळले आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या २७७ वर पोहोचली आहे.
मद्रास हाय कोर्टाने तामिळनाडू सरकारला राज्यातील सर्व दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने तामिळनाडू सरकारला उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दारू दुकानं बंद करण्याचा आदेश दिला आहे. (वाचा सविस्तर)
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 320 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 95 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 59 हजार 662 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 39 हजार 834 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 17 हजार 847 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 981 जणांचा समावेश आहे.
कोल्हापुरात गेले तीन दिवस एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यात करोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने पायीच चालत गावी निघालेल्या लाखो स्थलांतरित मजुरांचे हाल होत आहेत. कालच औरंगाबादमध्ये १६ मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. तशाच प्रकारची मन हेलावून टाकणारी घटना दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात घडली. वाचा संपूर्ण बातमी.
मुंबईची ओळख असलेला गणेशोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होतो. पण यंदा गणेशोत्सवावर करोना व्हायरसच्या संकटाचे सावट आहे. त्यामुळेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने यंदा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वाचा संपूर्ण बातमी.
देशभरासह राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं रुग्ण संख्ये आघाडीवर दिसत आहेत. पुण्यात मागील 24 तासांत करोनाने 9 जणांचा बळी घेतला असून 111 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत करोनाचे २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १९० वर पोहोचली आहे. पनवेल मनपा हद्दीत १७, पनवेल ग्रामीण हद्दीत करोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील १२७८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १०६० जणांचे अहवाल नकारात्मक आले. १९० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले, तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १२८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ८७, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३३, उरणमधील ३, श्रीवर्धनमधील १, कर्जतमधील १ तर अलिबागमधील २ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे
संगमनेर : नैसर्गिकरीत्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजून मृतदेहाजवळ बसत नातेवाइकांनी मोठा शोक केला. असंख्य गावकरी, तालुक्यातल्या अनेक गावांतील नातेवाईक मंडळीही मृतदेहाचे अंत्यदर्शन घेऊन आले. नंतर जेव्हा संबंधित वृद्धाचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्यांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले. या एकाच घटनेने संगमनेर शहरासह तालुक्याचे आरोग्य टांगणीला लागले आहे. काल धांदरफळ येथे घडलेल्या या घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे निघत आहेत.
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्याअंतर्गत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस व रेल्वेंना अनुमती देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत रेल्वे मंत्रालयाने २२२ विशेष रेल्वे सोडल्या असून अडीच लाखांहून अधिक लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी महिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दिली.
२३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण २१५ रेल्वे स्थानकांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी ५२३१ विशेष डब्यांची व्यवस्था केली जाणार असून प्रत्येक केबिनमध्ये किमान दोन रुग्णांना ठेवता येईल. ८५ स्थानकांतील डब्यांमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून आरोग्यसेवा कर्मचारी पुरवले जातील व १३० स्थानकांमध्ये ही व्यवस्था राज्य सरकारे करतील.
टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आला असला तरी रेस्ताराँ, बाजारपेठा सुरू करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली
देशांतर्गत लोकांच्या प्रवासाची सोय केल्यानंतर आता केंद्र सरकार विदेशात अडकलेल्या नागरिकांनाही टप्प्याटप्प्याने भारतात आणणार आहे. बिगर व्यावसायिक विमानसेवा तसेच नौदलाच्या जहाजांच्या मदतीने या नागरिकांना परत आणले जात आहे. विदेशात अडकलेल्या नागरिकांनी भारतीय दूतावास व उच्चायुक्त कार्यालयात नोंदणी करावी. करोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाच विमान प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे. देशात परत आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने स्वखर्चाने १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करणे सक्तीचे करण्यात आले असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.