मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वे मिळत असल्याचं सांगितल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचं आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला ५२५ ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून ७ लाख ३० हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री तसंच इतर शिवसेना नेत्यांनी केलेलं वक्तव्य पूर्ण राजकारण आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा- “सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्याच गैरसमजात रहावे”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट आहे. देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. सरकार पूर्पणपणे अपयशी ठरलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

Story img Loader