पालघर येथे जमावाने तिघांची ठेचून हत्या केल्याप्रकरणी राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“पालघरमध्ये घडलेली घटना आणि करोनाचा काहीही संबंध नाही. पालघरवरून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र बनवलं जात आहे. पालघरमधये जे काही झालं त्याचा कशाशी संबंध असेल तर त्याचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. अशी प्रकरणं घडायला नको. ते निषेधार्ह आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करा : शरद पवार

यावेळी शरद पवारांनी करोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे असं आवाहन केलं आहे. “तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाउनचा कालावधी नाईलाजानं तीन आठवड्यांसाठी वाढवावा लागला. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली तर ३ मे नंतर परिस्थितीत बदल होईल. नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यादरम्यान त्यांनी काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका असं म्हणत मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असंही स्पष्ट केलं.

आणखी वाचा- रमझानच्या महिन्यात घरातच नमाज पठण करा; शरद पवारांचं आवाहन

पालघर प्रकरणाला धार्मिक रंग नको : मुख्यमंत्री
पोलिसांनी तातडीने कारवाई करून प्रमुख पाच हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाला विनाकारण धार्मिक रंग देऊ नये. या प्रकरणावरून समाजमाध्यमांवरून तेढ निर्माण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. या प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली.दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे, असे ठाकरे म्हणाले.

या प्रकरणानंतर  गृहमंत्री अमित शाह यांच्याशी माझे बोलणे झाले. अमित शहा यांनाही घटनास्थळाच्या परिस्थितीची कल्पना असून या हत्याकांडाला धार्मिक संदर्भ नाही, हे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्याही ते लक्षात आले. त्यांनी काळजी घेण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.