आधी मजूर त्यांच्या गावी नीट पोहोचले का याकडे लक्ष द्या असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. महाराष्ट्रात मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, “तसं असेल तर आम्हाला देखील येथे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरु केलं पाहिजे. सर्वांना पारखून घेतलं पाहिजे. उत्तर प्रदेशातील मजूर त्यांच्या गावात नीट पोहोचलेत का? त्यांना अन्न पाणी नीट मिळतंय का याकडे योगींनी लक्ष द्यावं. दीड महिना महाराष्ट्रात मजुरांची कशी व्यवस्था केली होती याचे व्हिडीओ पाठवू शकतो. महाराष्ट्रात या मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते योगींना कदाचित आवडलं नसेल,” भाजपा व्यतिरिक्त सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं आहे असंही ते म्हणाले आहेत.
आणखी वाचा- यापुढे युपीमधील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक: योगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. “योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं,” असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.
आणखी वाचा- “महाराष्ट्रात यायचं असेल तर…”; राज ठाकरेंचे आदित्यनाथांना रोखठोक प्रत्युत्तर
योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुनच राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. “महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये (राज्यामध्ये) आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.