करोना रूग्णांवर उपचारावेळी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या व्हेंटीलेशन प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठात अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून मध्य भारतातील हे एकमेव असे केंद्र ठरले आहे.

करोना रूग्णावर उपचारादरम्यान गंभीर स्थितीत श्वाासोस्वास नियंत्रित ठेवणे महत्वाचे समजल्या जाते. ही प्रक्रिया समजून घेत त्याचा उपयोग रूग्णांसाठी केल्यास प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. ही व्हेंटीलेशनची प्रक्रिया यंत्राद्वारे शिकविण्याची सोय बहुतांश मोठ्या रूग्णालयात आहे. मात्र मानवी प्रतिकृती किंवा आभासी मानवी शरीरा (मॅनिक्यूअर)च्या माध्यामातून हे प्रशिक्षण दिल्यास डॉक्टर किंवा परिचारिका यांना व्हेंटीलेशन प्रक्रिया समजून घेणे सोपे जाते. हे आभासी मानवी शरीर औषधी किंवा अन्य उपचारावर जीवंत शरीराप्रमाणेच प्रतिसाद देते. उपचार केल्यास हुंकार उमटतो. मानवी देहाप्रमाणेच उपचारास प्रतिसाद मिळत असल्याने शिकणाऱ्यास तांत्रिक बाजू लक्षात येतात. म्हणजे किती ऑक्सिजन किंवा हवेचा दाब असावा, हे या माध्यमातून लगेच उलगडते.

प्रत्यक्ष रूग्णावर उपचार करतांना असे पूर्वज्ञान असल्यास वेळ वाया जात नाही. रूग्णाची स्थिती लवकर लक्षात येते, अशी माहिती विद्यापिठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी दिली. दीड कोटी रूपये खर्चाच्या या प्रशिक्षण केंद्रातून आगामी १५ दिवसात 250 डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले की हे पाश्चाात तंत्रज्ञान आहे. रूग्णावर उपचार करण्यापूर्वी या माध्यमातून व्याधीचे स्वरूप समजून घेतल्या जाते. पुणे- मुंबईकडे काही रूग्णालयात अशा प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. विदर्भात आमच्या विद्यापिठाने ही सोय उपलब्ध करून दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रशिक्षणामुळे तज्ञ मनुष्यबळ व्हेंटीलेशनसाठी उपलब्ध होईल, असे कुलगुरू डॉ. बोरले यांनी नमूद केले.