करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील तणावही मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक ठिकाणी सुविधांची कमतरता जाणवत असल्याचं दिसत आहे. आरोग्य सुविधांचा अभाव पाहता राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनसंबंधी निर्णय घेण्याची शक्यताही आहे. दरम्यान उस्मानाबादमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने बेड उपलब्ध होणं कठीण झालं आहे. रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली. घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना खूर्चीत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसत आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स आपल्याला शक्य ती सर्व मदत रुग्णांना करण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्याच्या करोना व्यवस्थापनात त्रुटी

उस्मानाबादमध्ये रविवारी ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यावेळी सात रुग्णांचा मृत्यूदेखील झाला. राज्यात रविवारी एकूण ६३ हजार नवे रुग्ण आढळले. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांनी पुणे, पालघर, भंडारासहित उस्मानाबादमध्येही ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा उल्लेख केला. उस्मानाबादमध्ये सध्या ४३०० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.

राज्यात दोन-तीन दिवसांत लॉकडाउन
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असले तरी ती तातडीने लागू केली जाणार नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाउनची शिफारस तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने केल्याने लॉकडाउनबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून, येत्या दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉकडाउन लागू केली जाणार नाही. सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. बहुधा १५ तारखेनंतर राज्यात लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.