लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. मालेगावमधील संगमेश्वर येथे मोसम नदीवरील अल्लमा पुलावर सकाळी हा प्रकार घडला आहे. बंदोबस्तावरील पोलिसांशी काही लोकांनी हुज्जत घातल्याचाही प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही वेळातच जादा कुमक आल्याने जमावाने  घटनास्थळावरू पळ काढला. तर, यावेळी दगडफेक झाली असल्याचे जरी सांगितले जात असले तरी, जमावाने दगडफेक केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकारामागचे कारण समजले नाही. परंतु, टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठीही बाहेर पडता येत नसल्याने निर्माण झालेल्या असंतोषातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या ठिकाणच्या पोलीस चौकीची मोडतोड झाली असल्याचीही माहिती समोर येत आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचेही कळते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

शहरात बुधवारी येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधितासह दोन संशयित अशा तिघांचा मृत्यू झाला. २४ तासांत ११ नवे रुग्ण आढळून आल्याने मालेगावातील करोना बाधितांची संख्या आता ९६ वर गेली आहे. तसेच आतापर्यंत करोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून अन्य तीन करोना संशयित मृतांचे अहवाल प्रलंबित आहेत.