डहाणू-नाशिक राज्यमार्गावर सरावली, गंजाड, सारणीच्या तीव्र वळणावर अपघाताचा धोका

डहाणू : डहाणू-नाशिक राज्यमार्गावर सारणी वळणाबरोबरच गंजाड, सरावली येथील तीव्र वळणे धोकादायक बनली आहेत.  दोन दिवसांपूर्वी वऱ्हाडाच्या वाहनाला सारणी वळणावर अपघात झाला होता. त्यामध्ये २३ जखमी झाले होते. या अपघातामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

डहाणू तालुक्यातील डहाणू-नाशिक राज्यमार्गावरुन मुंबई-अहमदाबाद महामार्ग गाठण्याकरता  डहाणू-चारोटी  मार्ग तसेच वाणगाव-वधना मार्गावरील सारणी पुलावरून वाहतूक केली जाते. या मार्गावर सारणी पुलावर तीव्र धोकादायक वळण आहे. या वळणावर वाहनचालाकाचा ताबा सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच हा पुल जीर्ण झाला आहे.

डहाणू शहर, सरावली, आसवे, आशागड, गंजाड, रायतळी रानशेत तसेच वाणगाव नजिकची सर्व वाहतूक सारणी पुलावरून केली जाते. म्हणजे तब्बल ४० हुन अधिक गावांचा वाहतुकीचा भार या पुलावरून वाहला जात आहे. तसेच या मार्गावर रिलायन्स औष्णिक प्रकल्प आणि प्रकल्पाकडे अवजडवाहनांची येथून दिवसरात्र  वाहतूक सुरु असते.

गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तीव्र वळणावर संरक्षक कठडा तुटलेला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहन थेट दरीत कोसळण्याचा धोका आहे. तर सरावली नदीवरील संरक्षक कठडेही तुटलेले आहेत.  येथेही वाहन थेट दरीत कोसळण्याची भीती आहे.

गंजाड तीव्र वळणावर कोणतेही संरक्षक कठडा नाही.त्यामुळे वाहने थेट पणे दरीत कोसळून अपघात होत आहेत.सा.बांधून खात्याचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

निवास वरठा, गंजाड ग्रामस्थ

गंजाड वळण येथे खात्याकडुन मोठा फलक लावण्यात येत आहे.तर वधना आणि ससरावली पुलाच्या दुरुस्ती आणि डागडुगीचा प्रस्ताव मंजुर होताच काम हाती घेऊ. प्रस्तावित नवीन पुलांमध्ये या पुलंचा समावेश  करण्यात आला आहे

– धनंजय जाधव, उपअभियंता डहाणू, सा.बा.खाते

Story img Loader