छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार आहे, अशी माहिती समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
रायगड येथे गेली काही वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात, वाजत-गाजत साजरा केला जातो. संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरूप आले आहे. लाखो शिवप्रेमी दरवर्षी ६ जून रोजी रायगडावर जमत असतात.
आता देशभर करोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्याचे सावट गंभीर होत चालले आहे, अशा परिस्थितीत महिनाभरावर आलेला शिवराज्याभिषेक सोहळा होणार का? याविषयी शिवप्रेमींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
याबाबत संभाजीराजे यांनी आज स्पष्टीकरण केले. ते म्हणाले, “करोनाचे संकट वाढत आहे. रायगडावर लाखो शिवप्रेमींची उपस्थिती असते. करोना टाळण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात येईल”