मेळघाटमधील वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम एस रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रेड्डी यांचं देखील नाव असून त्याच आधारावर रेड्डी यांना निलंबित करण्यात आलं आहे. दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी मेळघाटमध्येच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्तापर्यंत या प्रकरणात विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये विनोद शिवकुमार याने छळ केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Maharashtra Government suspends MS Reddy, former Regional Director of Melghat Forest Reserve in connection with the suicide case of forest officer Deepali Chavan. Deepali had levelled allegations of harassment against MS Reddy.
— ANI (@ANI) March 30, 2021
लेडी सिंघम म्हणून होती ओळख!
मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित होत्या. डिंक तस्करांचा पाठलाग करताना दीपाली चव्हाण दुचाकीवर थेट मध्य प्रदेशपर्यंत त्यांचा पाठलाग करत गेल्याचा किस्सा देखील अधिकारी आणि कर्मचारी अभिमानाने सांगतात. त्यामुळे लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, अचानक त्यांच्या आत्महत्येचं वृत्त आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ४ पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये आपल्या होत असलेल्या छळाचा उल्लेख त्यांनी केला आहे.
रेड्डींवर कारवाईसाठी भाजपा आक्रमक
भाजपाकडून रेड्डी यांच्या अटकेची मागणी लावून धरली जात आहे. मंगळवारी अपर मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर भाजपाकडून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्यावर कारवाईसाठी दबाव येत असताना सरकारकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण यांनी वारंवार विनोद शिवकुमार याची तक्रार केल्यानंतर देखील त्याच्यावर कारवाई न करता रेड्डींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.