दिल्ली येथील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; ब्रॉडगेजच्या कामाला गती येणार

अकोला : अकोला- खंडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामातील वनविभागाचा तांत्रिक अडसर दूर करण्याचा निर्णय दिल्ली येथील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेज परिवर्तनामुळे देशातील नऊ  राज्य जोडली जाणार आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ  वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी दिल्ली येथील परिवहन भवन येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हद्दीतून जाणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणीवर चर्चा करण्यात आली. वन संवर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच अकोला-खंडवा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वेमार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रूपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी बैठकीनंतर दिली. आजच्या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्यामुळे परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या अकोट ते आमला खुर्द या गेज रूपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. लवकरच या मार्गावरील गेज परिवर्तनाच्या कामास सुरुवात होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या अकोला-अकोट मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील अकोट ते आमला खुर्द हा भाग अमरावती अकोला जिल्हय़ातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज परिवर्तनात केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे अकोट ते आमला खुर्द हे गेज  परिवर्तनाचे काम रखडले होते, असेही खासदार धोत्रे यांनी सांगितले.

अकोला ते खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात तांत्रिक अडचण दूर झाल्याने या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचे  रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात अकोला-खंडवा-रतलाम या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटरगेजहून ब्रॉडगेज करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.