वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण-उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. यावर्षी वसुबारस ४ नोव्हेंबर २०१८ रोजी रविवारी असून धनत्रयोदशी, यमदीपदान ५ नोव्हेंबर २०१८ रोजी सोमवारी आहे. नरक चतुर्दशी ६ नोव्हेंबर २०१८ रोजी मंगळवारी असून खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो.
यावर्षी लक्ष्मीपूजन ७ नोव्हेंबर २०१८ रोजी बुधवारी असून सुर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते. लक्ष्मीपूजन मुहूर्त ७ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४:३५ ते रात्री १०:४५ पर्यंत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ८ नोव्हेंबर २०१८ रोजी गुरुवारी असून याच दिवशी व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे ३:३५ ते ५:०५, सकाळी ६:४५ ते ८:१०, सकाळी १०:२५ ते ११:५५ असे आहेत आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज ९ नोव्हेंबर २०१८ रोजी शुक्रवारी आहे. दिवाळीचा हा सण सर्वांनी आनंदाने व उत्साहाने आपापल्या परंपरेप्रमाणे साजरा करावा असे आवाहन पंचांगकर्ते दाते यांनी केले आहे.
वसुबारस (४ नोव्हेंबर २०१८, रविवार)
या दिवशी सौभाग्यव्रती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून पूजन करतात.
ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।
अर्थ – हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.