रवींद्र जुनारकर

कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यात करोना लसीकरणाची मोहीम धडाक्यात सुरू आहे. मात्र कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही   चंद्रपूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .राजकुमार गहलोत, डॉ.अनंत हजारे व त्यांच्या पत्नी डॉ. श्रीमती हजारे  बाधित झाल्या आहेत. डॉ. गहलोत यांनी प्रस्तूत प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी त्यांना करोनाची लागण झाली. विशेष म्हणजे, दोन्ही मात्रा घेऊन त्यांना ४२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. करोना बाधित झालो असलो तरी कोविशिल्ड लस अतिशय चांगली व सुरक्षित असल्याचा दावा डॉ. गहलोत यांनी केला आहे याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत हजारे व त्यांच्या पत्नी यांनीही कोविशिल्ड लस घेतली. डॉ. हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहिली लस २४ जानेवारी रोजी  तर दुसरी लस २३ फेब्रुवारी रोजी घेतली. या दोघांनाही लस घेऊन ५५ दिवसांचा कालावधी मात्र पूर्ण झालेला नाही असे त्यांनी सांगितले.

दरम्यान,  लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही  डॉक्टर बाधित होत असल्याने आरोग्य यंत्रणा बुचकाळयात पडली आहे.

नागपूरमधील परिचारिका, डॉक्टरांनाही लागण

लसीसी दुसरी मात्रा घेतल्यानंतरही कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राज्य अध्यक्ष व अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स)चे एक डॉक्टरही करोना बाधित झाले आहेत. त्यांनी दुसरी मात्रा घेऊन पंधरा दिवस झाल्यावर त्यांना विषाणूची बाधा झाली. परंतु  त्यांना गंभीर त्रास झाला नाही.  महापालिका हद्दीतील एका आणखी डॉक्टरलाही दुसरी मात्रा घेतल्यावर करोनाची लागण झाली.

Story img Loader