भारतीय संस्कृती आणि तिचे महात्म्य मोठे आहे. या संस्कृतीच्या मदतीने आपण पुढे जायला हवे. एकदा एखाद्या संशोधकाने सिद्धांत मांडला की तो फक्त सिद्धांत नसतो. त्यामागे संशोधन असते. त्यानंतर सिद्धांत मांडला जातो. सिद्धांताला ठोस आधार असतो. असे असूनही जर सिद्धांत कोणी नाकारत असेल तर ते योग्य नाही. आपल्याला पुढे जायचे आहे की मागे जायचे आहे? ते ठरवा असे म्हणत डॉक्टर अनिल काकोडकरांनी सत्यपाल सिंह यांना टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
[jwplayer y4EOsrof]
माकडे माणसाचे पूर्वज आहेत असे सांगितले जाते. मात्र वेद-शास्त्रांमध्ये याचा उल्लेख नाही, आपण आत्ता आहोत तसेच होतो असे मत केंद्रीय मंत्री डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली, कारण त्यांनी डार्विनचा सिद्धांतच आपल्या वक्तव्यातून नाकारला. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनातच त्यांनी हे वक्तव्य केले होते. असा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षकांचे पूर्वज माकड असेल आमचे पूर्वज नाही असेही त्यांनी म्हटले होते. याच गोष्टीवर आता अनिल काकोडकर यांनी टीका करत मागे जायचे आहे की पुढे हे ठरवा असा टोला लगावला आहे.