भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात येण्याची खुली ऑफर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना सत्तार यांनी खडसेंना बाहुबलीची उपमा दिली.

सत्तार म्हणाले की, “कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं पुन्हा पुन्हा सांगायला नको. खडसे यांच्या भाजपामध्ये अन्याय झाला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती तुटली. आता खडसे यांनी भाजपा पक्ष सोडून शिवसेनेत यावे. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल. आम्ही शिवसेनेत त्यांचे स्वागत करु”

एकनाथ खडसे राजकारणातून कधीच संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो अन् त्या अपघाताने एखादा नेता मागे पडतो पण संपत नाही. खडसे यांच्यावर भाजपात अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे. एकनाथ खडसे यांनी ओबीसी समाजाल घेऊन शिवसेनेत यावं. त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू, असेही सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकनाथ खडसे खरंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण एमआयडीसी जमीन घोटाळयाच्या आरोपामुळे त्यांना २०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून भाजपा आणि एकनाथ खडसे यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. खडसेंनी उघडपणे भाजपाच्या काही नेत्यांवर टीका केली आहे.