शेतकऱ्याचे घर ज्या दूधावर चालते, त्या दूधाचे सध्या पाट वाहताहेत. रस्त्यावर ‘लाल चिखल’ झालाय. वरुण राजा बांधावर आला आहे अन् बळीराजा रस्त्यावर. तरीही शेतकऱ्यांची दखल न घेणारी सरकार नावाची यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. विश्वास तरी कोणावर ठेवावा, असा प्रश्न पडतोय. कारण विश्वास ठेवावा असा चेहरा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही शोधून सापडत नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झालाय. लेकरासारखा जपलेला भाजीपाला आणि लेकरांच्या तोंडचं दूध रस्त्यावर फेकतोय. शेतकरी संपामुळे सैरभैर झालेल्या मनाला विश्वास देण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे आज ‘मुंडे साहेब’ हवे होते, अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

राज्यात शेतकरी नेते अनेक आहेत आणि होते. त्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हेही अग्रस्थानी होते. शेतकरी, ऊसतोड कामगार, कारखानदार या तिन्ही परस्परविरोधी गटांचे नेतृत्व करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. प्रत्येकाला तो आपला नेता आहे, असे वाटायचे. मग सत्तेत असो की विरोधात, या बाबी दुय्यमच होत्या. मुंडे नावाचं वलय होतं. आज शेतकरी संपावर गेल्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का? असा प्रश्न पडतोय.
विरोधीपक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष मानला जातो. शेतकऱ्यांसाठी ‘संघर्ष यात्रा’ काढूनही आम्ही तुमच्या प्रश्नावर लढतोय, हा विश्वास विरोधी पक्षांना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण करता आला नाही. मात्र या ‘संघर्ष यात्रे’मुळे गोपीनाथ मुंडे यांचा ‘संघर्ष’ सगळ्यांना आठवला. विरोधी पक्ष नेता असावा तर, गोपीनाथ मुंडेंसारखा असे त्यांचे मित्र विलासराव देशमुखही म्हणायचे. तळागाळातील लोकांशी त्यांची असलेली नाळ यामुळे त्यांच्या इशाऱ्यावर आंदोलन सुरु व्हायचं आणि संपायचंही. मात्र आज विरोधी पक्षाचा सत्ताधारीपणाचा बाज अजूनही गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ते आपलेसे वाटत नाहीत. तर सत्ताधारी सत्तेत मश्गुल आहेत. विरोधी पक्षात असताना फक्त आंदोलने करायची असतात, हे माहित असलेल्या सत्ताधारी भाजपला आणि नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी असे वाटत नाही. त्यांना आता शेतकऱ्यांचा विसर पडलेला दिसतोय, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. कर्जमाफी अशा मागण्यांसाठी विरोधी पक्षात असताना मुंडेंसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आंदोलने केली. सोयाबीनला हमीभाव मिळावा, या त्यांनी केलेल्या मागणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मात्र सत्तेवर आल्यानंतर आपण विरोधी पक्षात असताना केलेल्या मागण्यांचा विसर फडणवीस यांना पडला आहे, असे आता शेतकरी म्हणत आहेत. शेतकऱ्यांनी संपाचा इशारा देऊनही मुख्यमंत्र्यांना प्रश्न हाताळता आला नाही. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करणारी भाजप-शिवसेना सत्तेत असताना सरकारविरोधात रोष निर्माण होऊ नये, याची काळजी स्वतः मुंडे घायचे. मित्र पक्षासोबत असलेला समन्वय, तळागाळातील जनतेशी असलेली नाळ आणि निर्णय घेण्याची धमक यामुळे भाजपची सत्ता कधी निर्ढावलेली वाटली नाही. मात्र चेहरे बदलले, वारसदार आले. पण वसा कोणी घेतला नाही. त्यामुळे सत्तेतील कोणत्या चेहऱ्यावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. खंबीरपणे शेतकरी प्रश्नावर लढणारा विरोधक नाही. त्यामुळे प्रश्न समजून घेऊन त्याच्यासाठी लढा देणाऱ्या, त्यावर उपाय सुचवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची उणीव भासत आहे, अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.