करोनाने रक्ताची नातीही तुटली

नगर : करोनाच्या धास्तीने नातेसंबंधातही अंतर पडू लागले आहे. मुंबईहून आलेल्या तरुणाला वडिलांनीच घरात घेतले नाही. त्यामुळे प्रशासनाने त्याला नगरच्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. घरी सहारा न मिळाल्याने त्याला आता सरकारी निवारा केंद्रात आश्रय घ्यावा लागणार आहे.

राहुरी शहरातील एक तरुण मुंबईत नोकरी करतो. करोनाच्या भीतीने तो दुचाकीवरून ६०० किलोमीटर अंतर पार करून शहरात आला. पण त्याला जन्मदात्या पित्याने घरात घेतले नाही. अखेर तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी राहुरी फॅक्टरी येथील सहारा निवारण केंद्रात त्याची सोय केली. त्याआधी नगरच्या सरकारी रुग्णालयात त्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले.

तहसीलदार शेख यांना हा तरुण भेटला तेव्हा वडिलांनी घरात न घेतल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मात्र या तरुणाला ठेवायचे कोठे, हा प्रश्न निर्माण झाला. निवारा केंद्रात परप्रांतीय मजुरांना ठेवले जाते. पण गावात घर असूनही त्याच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. संत गाडगेबाबा आश्रमशाळेत अगोदरच ४२ परप्रांतीय व अन्य काही मिळून ७० नागरिकांचे विलगीकरण केले असल्याने येथेही जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याला राहुरी फॅक्टरी येथे ठेवण्यात आले. पण नंतर त्याला तपासणीसाठी नगरला नेण्यात आले.

Story img Loader