राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबतचे निर्देश दिले आहेत.

सद्यस्थितीत राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेत. या निर्णयामुळे   एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सध्याच्या करोना व्हायरसच्या संसर्गाच्या परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुमारे चार हजार डॉक्टर्स राज्यात उपलब्ध होतील, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे याबाबत माहिती देण्यात आली.

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय पण डॉक्टरांची संख्या तुलनेने कमी असून वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ व नुकतेच एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी सेवा देत आहेत. त्यामुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी सद्यपरिस्थिती पाहून इंटर्नशीप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठय़ा प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.