राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या सुरूवातीलाच एक अजब योगायोग असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभागृहात टाळ्या वाजल्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते.

मात्र, त्यानंतर चारच दिवसांत अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्याला आजच्या दिवशी (०६ मार्च रोजी) १०० दिवस पूर्ण झाल्याचे आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले. त्याच शंभराव्या दिवशी आपण हा अर्थसंकल्प मांडत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयोध्या दौरा करणार आहेत.