अहो आश्चर्य! मिरजेत उंबराच्या झाडाला फूल आले. आणि नवरात्रीच्या सणात हे आश्चर्य पाहण्यासाठी शेकडो श्रद्धाळूंचे पाय मिरजेच्या किल्ला भागातील घटनास्थळाकडे धावले. समाजमाध्यमातून उंबराच्या फुलाचे छायाचित्र प्रसारित झाल्याने गर्दी वाढतच गेली. या नेमक्या स्थितीचा लाभ घेत देउळ चित्रपटातील कथेप्रमाणे गर्दी ‘कॅश’ करण्याचा प्रयत्नही झाला. पण या झाडाला आलेले हे फूल नसून तो बुरशीचा एक आविष्कार असल्याचे समजताच उपस्थित साऱ्यांनीच डोक्याला हात लावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की मिरजेच्या किल्ला भागात खंदकाशेजारी रस्त्याकडेला दत्त मंदिर आहे. या मंदिराजवळच उंबराचे झाड असून आज सकाळपासून या उंबराला फूल उमलल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. शेजारी राहणाऱ्या एका शिक्षकाने या चच्रेचे भांडवल करीत साग्रसंगीत होमहवन विधीही केला. दर बारा वर्षांनी उंबराला उमलणाऱ्या फुलाचे दर्शन नागरिकांनी घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
उंबराला फूल ही दुर्मीळ म्हणण्यापेक्षा अनैसर्गिकच असल्याचे मानले जाते. कारण उंबराच्या फळामध्येच फुलाचे स्त्री केशर असते. कीटकाच्या माध्यमातून या वृक्षबीजाचे फलित होते. मात्र समाजमनात उंबराचे फूल दिसणे हे भाग्याचे मानले जाते. पौर्णिमेच्या मध्यरात्री हे फूल एकच वेळ येते. संपूर्ण औदुंबराच्या वृक्षाला फेरी मारून परत जाते. या कालावधीत झाडाखाली कोण नशिबवान आहे त्यालाच या फुलाचे दर्शन मिळण्याची संधी असते. असे समाजमनात मानले जाते. मात्र आज दिवसा उंबराच्या झाडाला फूल उमलल्याचे समजताच सर्व सामान्यांची पावले दर्शनासाठी किल्ल्याकडे वळली. प्रांत कार्यालयाजवळच हे घटनास्थळ असल्याने तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनीही या फुलाचे दर्शन घेऊन त्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसिद्ध केले. यामुळे या अफवेला आणखी गती आली. सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील, ज्योती आदाटे आदींनी या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हा एक बुरशीचा प्रकार असल्याचे लक्षात आले.