गुंतवणूकदारांचे पैसे थकवणाऱ्या डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फटकारले. नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहेत. ५० कोटींपैकी १२ कोटी रुपये भरणाऱ्या डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे.
ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी सुनावणी झाली. डीएसकेंना हायकोर्टात ५० कोटी रुपये जमा करायचे होते. मंगळवारी डीएसकेंनी यातील १२ कोटी रुपये जमा केले. बुलढाणा अर्बन बँक डीएसकेंच्या मदतीला या संकटसमयी धावून आली आहे. बुलढाणा बँकेने १२ कोटी रुपये दिल्याची माहिती कुलकर्णींच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. लिलावासाठी संपत्तीची कागदपत्रे सादर केल्यानंतर बँकेने हे पैसे जमा केले आहेत. तसेच याच बँकेकडून १०० कोटी रुपये घेणार असून या मोबदल्यात बँकेकडे मालमत्तेचे कागदपत्रं दिली जातील, असे त्यांनी हायकोर्टात सांगितले.
सुनावणीदरम्यान बँकेचे अधिकारीही कोर्टात उपस्थित होते. डीएसकेंना १०० कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे त्यांनी बँकेत सांगितले. मात्र यासंदर्भात बँकेच्या संचालक मंडळात ठराव झाला आहे का असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. या ठरावाबाबतची कागदपत्रे तात्काळ सादर करा, असे हायकोर्टाने सांगितले. ठेवीदारांची २३२ कोटी रुपयांची देणी बाकी असल्याचे डीएसकेंच्या वतीने हायकोर्टात सांगण्यात आले. पुढील सुनावणीसाठीदेखील डीएसके दाम्पत्याला हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश द्यावे, असे पोलिसांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. यावर बोलताना हायकोर्टाने डीएसकेंवर ताशेरे ओढले. डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे.