महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्हयात झालेल्या भूसुरुंग स्फोटाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कैलास रामचंदानी असे आरोपीचे नाव आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी एक मे रोजी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूळखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. पोलिसांनी नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून पोलिसांनी दिलीप हिडामी, परसराम तुलावी आणि अन्य् तिघांना अटक केली होती.
त्यांच्या चौकशीतून कैलास रामचंदानीचे नाव समोर आले. कैलासचे कुरखेडा येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कुरखेडा तालुक्याचा प्रमुख पदाधिकारी आहे. त्याचा या स्फोटाशी काय संबंध आहे. तो नक्षलवाद्यांच्या कसा संपर्कात होता त्याची पोलीस चौकशी करत आहेत.