येथे आषाढी यात्रेला जवळपास १० लाख वारकरी दाखल झाले होते. यात्रेनंतर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. या पाश्र्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भारुड यांनी महास्वच्छता अभियान राबविले. जवळपास १२ हजार लोकांनी विविध ठिकाणाहून सुमारे ६० टन कचरा गोळा केला.आता दर यात्रेपूर्वी व नंतर स्वच्छता अभियान राबविण्याचे प्रशासनाने जाहीर केले.

यंदाच्या आषाढी यात्रेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भारुड यांना स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केले. ‘पंढरीचे दारी, स्वच्छतेची वारी’, ही संकल्पना घेऊन डॉ. भारुड यांनी जि.प. कर्मचाऱ्यांना यात्रा कालावधीत ड्रेस कोड दिला. पालखी तळ, पंढरपूर परिसर येथे स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबविले. यात्रेआधी आणि यात्रेनंतर स्वच्छता राबविण्याचे प्रशासनाकडून ठरविले जाते .मात्र हे अभियान कागदावरच राहते असा अनुभव होता. मात्र या वर्षी खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आषाढीवारी नंतर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत पंढरपूर येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ संत नामदेव समाधी येथे व चंद्रभागा वाळवंटात भक्त पुंडलिक मंदिराजवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे सभापती शीला शिवशरण, प्राचार्य बी. पी. रोंगे, मुख्याधिकारी अभिजित बापट, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.

महास्वच्छता अभियानास मंगळवारी सकाळी सुरूवात झाली. या साठी १५ जणांचा एक गट तयार केला होता. या गटाने शहरातील प्रदक्षिणा मार्ग,मंदिर परिसर,बस स्थानक,रेल्वे स्टेशन,चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील ६५ एकर,वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता सुरु झाली. स्वच्छता करणाऱ्या कर्मचारी,अधिकारी यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. तर कचरा गोळा करण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये शहरातील विद्यार्थी, युवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. महास्वच्छता अभियानामुळे सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते. या स्वच्छता अभियानात कर्मचाऱ्यांचा उत्साह दिसून आला ही कौतुकाची बाब असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी व्यक्त केले. तर, पंढरपुरात स्वच्छतेच्या माध्यमातून विठुरायाची सेवा करण्याची संधी मिळाली. स्वच्छता अभियानात प्रत्येकाने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भारुड यांनी सांगितले.

एकंदरीत पालिकेने या आधी स्वच्छता अभियान राबवून जवळपास ३०० टनांहून अधिक कचरा गोळा केला होता. असे असले तरी या अभियानामुळे पंढरपूर स्वच्छ झाले आहे.

यात्रेपूर्वी आणि नंतरही अभियान राबविणार

पंढरपूर येथे यात्रेला लाखो वारकरी येत असतात. यात्रा संपल्यावर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर या अभियानातून स्वच्छतेचा संदेश जातो आणि शहरही स्वच्छ होते. लोकांच्या सहभागाशिवाय स्वच्छता शक्य नाही. या पुढील काळात यात्रेपूर्वी व यात्रेनंतरदेखील महास्वच्छता अभियान राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वेळी केले.