भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली होती. खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजन यांनी खुलासा केला आहे. खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी जाहीरपणे त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला असला, तरी त्यांनी माझ्या कानात त्या व्यक्तीचं नाव सांगावं,” असं आवाहन महाजन यांनी खडसे यांना केलं आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी प्रथमच फडणवीस यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. फडणवीस आणि महाजन यांच्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असं खडसे म्हणाले होते. त्यांनी केलेल्या आरोपाला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं.
माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, “खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. आमच्या बैठकीत त्यांच्याबाबत कोणताही विषय झाला नाही. केंद्रीय समितीत एकूण अठरा सदस्य होते. त्यांनीच तिकीटाविषयीचा निर्णय घेतला. त्यात आमचा कोणताही संबंध नाही. खडसे यांनाच तिकीट नाकारण्यात आले असंही नाही. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह अनेक जणांना तिकीट दिलं गेलं नाही. खडसे यांच्या घरात पक्षात तिकीट दिलं होतं. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे,” असं महाजन यांनी सांगितलं.
…तर मी शिक्षा घेण्यास तयार
कोअर कमिटीतील सदस्यांनी आपल्याला ही माहिती दिली, असा दावा खडसे यांनी केला होता. त्यालाही महाजन यांनी उत्तर दिलं आहे. “नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्याबाबत पुरावा द्यावा. जाहीरपणे नाव सांगण्यास नकार दिला असला तरी त्यांनी माझ्या कानात त्या व्यक्तीचं नाव सांगावं. त्यांनी पुरावा दिला, तर पक्ष देईल ती शिक्षा घेण्यास मी तयार आहे. पण कोणताही पुरावा नसताना आरोप करणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे,” असं महाजन म्हणाले.