राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य सरकारच्या कामावरून आरोप केले जात आहेत. सरकारकडूनही फडणवीस यांना उत्तर दिली जात आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनीही निशाणा साधला आहे. “फडणवीस साहेब, थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा,” असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना ‘मौनंम सर्वार्त साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय,’ अशी तीन पुस्तके भेट देणार आहे. फडणवीस साहेब थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा,” असा टोला मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. त्यांना मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट देणार आहे.
फडणवीससाहेब, थोडं शांत बसा आणि सरकारचं काम बघत रहा! pic.twitter.com/p7whYFzp4k— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) May 29, 2020
राज्यावर करोनाचं संकट ओढवलं असून, प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तरीही रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील स्थिती करोनामुळे गंभीर बनली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी राज्य सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर राज्य सरकारविरोधात माझं अंगण रणांगण आंदोलनही करण्यात आलं.